कलवड मधील ८५ घरे पाडण्यासाठी मनपाची नोटीस
नागरीक भयभयीत; घरांवर कारवाई न करता पावसाळी लाईन टाकण्याच्या आमदार टिंगरे यांच्या सुचना

लोहगाव : नाला, पावसाळी वाहिन्यांवर घरे बांधणाऱ्या कलवड वस्ती मधील ८५ जणांना महापालिका बांधकाम विभागाने नोटीस दिल्या आहेत. राहत्या घरांना नोटीस आल्याने रहिवाशी भयभीत झाले होते. आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी करत महापालिका अधिकाऱ्यांना वस्तीमध्ये आणून रहिवाशांच्या घरांवर कारवाई न करता पावसाचे पाणी चारही दिशांना बंद पाईप लाईनद्वारे नेवून पुढे नाल्यात सोडावे अशा सुचना महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कलवड वस्तीची पहाणी करण्यासाठीं आमदार सुनील टिंगरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त चंद्रसेन नागटिळक, कनिष्ठ अभियंता नितिन चांदणे, सुहास अलबर यासह अधिकारी, स्थानिक नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
मागील पावसात कलवड मध्ये पूर परिस्थती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात मोठ्याप्रमाणावर पाणी गेले होते. सखल भागांत सुमारे १० फूट पाणी साचले होते. यावेळी प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काही दिवसांनी महापालिका बांधकाम विभागाने नाला, पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज लाईनवर घरे बांधणाऱ्या सुमारे ८५ जणांना स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कारवाई करू अशी नोटीस दिल्यानंतर कारवाईच्या भितीने नागरीक प्रचंड घाबरले होते. रहिवाशांनी आमदार सुनील टिंगरे यांची भेट घेवून घरे वाचवण्याची विंनती केली होती.
आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा करून घरे वाचवून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. आमदार टिंगरे यांनी कलवड मधून सखल भाग असलेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्याच्या मलनिसारण विभागाला सूचना देऊन काम करण्याच्या सूचना केल्या. घरांवर कारवाई होणार नसल्याने नागरीकानी समाधान व्यक्त केले.
आमदारांनी दाखवल्याप्रमाणे पाण्याचा निचरा होतो का याचा सर्व्हे करून काम केले जाईल असे मलनिःसारण विभागाचे अभियंता सुहास अलबर यांनी सांगितले.
अनेक वर्षे नागरीक या परिसरात वास्तव्य करत आहेत. नाला, पावसाळी वाहिन्यावर जर बांधकामे झाली असतील तर त्याचवेळी बांधकाम करताना मनपाने ते थांबविणे आवश्यक होते. आता राहत असलेल्या घरांवर कारवाई करून नागरीकांना बेघर न करता पावसाळी लाईन टाकता येतात हे अधिकाऱ्यांना जागेवर आणून दाखवून दिले. त्यानुसार काम करण्याचा सूचना केल्या. – सुनील टिंगरे (आमदार, वडगावशेरी)
मलनि:सारण विभागाला लाईन टाकण्यासाठी जेवढे अतिक्रमण काढायचे होते तेवढे बांधकाम विभागाने काढले आहे. पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी अडथळा ठरणारे आणखी काही अतिक्रमण जर काढावे लागत असेल तर काढावे लागणार आहेत. – रोहिदास गव्हाणे (कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग)