खेळताना अर्थिंगचा शॉक लागून दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
वडगावशेरी गणेश नगर येथील धक्कादायक घटना

पुणे : खेळताना अर्थिंगच्या वायरला चुकून हात लागल्यामुळे दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री वडगावशेरी गणेशनगर येथे घडली.
मोहित वेदकुमार चावरा (वय १० रा. गणेशनगर वडगावशेरी, पुणे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित बुधवारी (दि. १२ जून) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घराच्या जवळ खेळत असताना त्याचा हात अचानक अर्थिंगच्या वायरला लागला. त्यामध्ये विद्युत प्रवाह असल्यामुळे त्याचा जोरदार शॉक लागून उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या लहान भावाने ही घटना पाहून कुटुंबीयांना सांगितले. मोहित हा आई-वडील व लहान भावासह गणेश नगर येथे राहायला होता. वडगावशेरी येथील एका खाजगी शाळेत चौथ्या इयत्तेत तो शिकत होता. त्याचे वडील व्यवसायिक असून हे कुटुंब मूळचे गुजरातचे आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मागील अनेक वर्षांपासून गणेश नगर वडगावशेरी येथे ते वास्तव्यास आहेत. मोहितच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांसह परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.