धानोरी, लोहगाव परिसरातील हॉटेल्समधून विनापरवाना दारू विक्री
टपरीमधून दिली जाते मद्यपींना रात्रभर सेवा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

» आमदार रवींद्र धंगेकर यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवणार असल्याचा सुज्ञ नागरिकांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला इशारा
» अवैध दारू विक्रेत्या हॉटेल्स चालकांवर कारवाईची मागणी
» अनेक वर्षांपासून होत आहे खुलेआम अवैध दारूची विक्री
लोहगाव : कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांनी पब, बारवर कारवाईचे हत्यार उगारले. दंड, सील ठोकत नियमावलीचे कडेकोट पालन करण्याच्या सूचनाही दिल्या. परंतु धानोरी, लोहगाव मध्ये मात्र गेल्या दोन दशकांपासून अनाधिकृत हॉटेलमधून खुले आम दारु विक्री होत असताना ते कायमचे बंद का होत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
धानोरी रोड, लोहगाव-वाघोली रोडसह याच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर गेली अनेक वर्षांपासून हॉटेलमधून विनापरवाना दारु विक्री व पिण्यास दिली जात आहे. परमिट रुम नसतानाही खुलेआम बार भरविला जात आहे. इतकेच काय तर ड्राय डे दिवशीही या हॉटेल्समधून दारु विक्री होते. स्थानिक विश्रांतवाडी तसेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना हॉटेल सुरू आहेत. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने बिनधास्त अवैध दारू विक्री चालू आहे. कल्याणीनगर मध्ये एवढी मोठी दुर्घटना घडून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे अवैध दारू विक्रेत्या हॉटेल्स चालाकंकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
धानोरी रस्त्यांवरील हॉटेल विराज, भरत ढाबा, पोरवाल रस्ता, साठे वस्ती, लोहगाव- वाघोली रस्त्यांवरील हॉटेल अर्पिता, रुद्रराज हॉटेल, हॉटेल आकाश, हॉटेल रिलॅक्स, निरगुडी रस्त्यावरील हॉटेल रॉयल, हॉटेल दुर्गा या हॉटेल वाल्यांकडे परमिट रुम, बिअर बारचा परवाना नसताना गेली अनेक वर्षांपासून हॉटेल्समधून खुलेआम देशी, विदेशी दारूची चढ्या भावाने ग्राहकांना विक्री व पिण्यासाठी दिली जात आहे. साठे वस्तीमधील टपरीवर तर रात्रभर दारु उपलब्ध करून मद्यपींसाठी सेवा दिली जाते. अवैध दारू विक्रेते हॉटेल्स चालक कोणाच्या आशीर्वादाने ही विक्री करता याची चौकशी होणे गरजेचे आहे.
झोपेचे सोंग घेणाऱ्या पोलीस व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी आतातरी जागे होऊन कारवाई करावी अन्यथा आमदार रवींद्र धंगेकर यांना लोहगाव, धानोरी परिसरातील प्रत्यक्ष वस्तूस्थिती दाखवण्यात येईल असा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर सुज्ञ नागरिकांनी दिला आहे.
अनेक ठिकाणी हातभट्टी दारू विक्री
लोहगाव व परिसरातील हॉटेल्समधून देशी, विदेशी विक्री होत असलेल्या दारूबरोबरच अनेक ठिकाणी गावठी हातभट्टी दारूची विक्री होत आहे. त्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
धानोरी, लोहगाव भागात हॉटेल्समधून विनापरवाना दारु विक्री व पिण्यासाठी उपलब्ध होत असेल तर पथक पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – सागर धोमकर (उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क)