सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाचा हातभट्टीवर छापा
१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन जणांवर गुन्हा दाखल
पुणे : लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव शिंदे येथे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हातभट्टीवर छापा टाकला. सात ठिकाणी जमिनीच्या खाली असणाऱ्या टाक्या उध्वस्त केल्या आहेत. सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांचे रसायन व दारू हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गोवर्धन सोलंकी, अरुण रमेश कुवरीया, संजय जगन्नाथ कुवरीया (तिघेही रा. वडगाव शिंदे ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दील वडगाव शिंदे येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री व तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून १ कोटी ५ लाख रुपये किंमतीचे २ लाख १० हजार लिटर हातभट्टी दारू, तयार करण्यासाठी लागणारे रसायन, एक लाख ८० हजार रुपये किंमतीचे १५०० लिटर हातभट्टी गावठी दारू, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे १५ हजार रुपये किंमतीचे साहित्य असा सुमारे एकूण १ कोटी ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार तुषार नामदेव मिवरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.