बारा वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची कामगिरी

पुणे : पुणे पोलीस अभिलेखावरील गेली बारा वर्षांपासून फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गुजरात येथील बारडोली येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
रहीम उर्फ वहीम अब्बास पटेल (वय ४५ अस्थान जिम कंपाउंड ता. बारडोली जि. सुरत, मूळ राहणार राम टेकडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेली बारा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळ्या टिम तयार केल्या. कार्यक्षेत्रातील रामटेकडी, हडपसर, वानवडी आदी परिसरात टीमकडून त्याचा शोध सुरु केला. नातेवाईक मित्र परिवार यांचेकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये पथकाला यश आले नाही.
आरोपीचा शोध सुरु असताना युनिट-५ चे पोलीस अंमलदार राजस शेख यांना फरार आरोपी हा नाव बदलुन बारडोली, गुजराज येथे राहत असल्याची खात्रशीर माहिती गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. तसेच त्याचा तेरा वर्षापुर्वीचा फोटो सुद्धा मिळाला.
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट-५ चे एक तपास पथक तात्काळ बारडोली, गुजरात येथे रवाना झाले. पथकाने बारडोली येथे त्याचा शोध सुरु केला परंतु पोलीसांकडे त्याचा सुमारे तेरा वर्षापुर्वीचा फोटो असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड होत होते. तरी देखील पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शिस्तबध्द नियोजन करून बारडोली येथे कमी लोकवस्तीत राहत असलेल्या ठिकाणाहून युनिट-५ च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलीस अटक करतील या भीतीने वेगवेगळया ठिकाणी १२ वर्षापासुन स्वतःचे नाव बदलुन राहत असल्याची त्याने कबुली दिली. त्यास ताब्यात घेऊन वानवडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.