दरोडा टाकणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद
लोणीकंद तपास पथकाची कामगिरी; उबाळेनगर परिसरातून घेतले ताब्यात
वाघोली : दरोडा टाकणाऱ्या टोळीतील आरोपीला वाघोली येथील उबाळेनगर परिसरातून लोणीकंद पोलीस तपास पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
योगेश ऊर्फ नरेंद दिलीप नवगरे (रा. कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस तपास पथक शुक्रवारी (दि. १५ सप्टेंबर) गस्तीवर असताना वाघोलीतील उबाळेनगर येथील पंजाबी स्पाईस हॉटेलचे पाठीमागे एक संशयास्पद मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर मोटार कार उभी असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल ढोणे यांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. संशयित कार घेण्यासाठी येताच तपास पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता तीन साथीदारासह येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिमा घाट ब्रिजखाली धारदार शस्त्राने धाक दाखवून दरोडा टाकल्याची कबुली दिली. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी इतर तीन साथीदारासह धारदार शस्त्राने गंभीर मारहाण करुन जबरदस्तीने रोख ९० हजार रुपये काढून काढुन घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. लोणीकंद तपास पथकाने त्याची अंगझडती घेवून गुन्हयातील रकमेपैकी ५ हजार व त्याचेकडे असलेली कार जप्त केली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पवार, पोलीस नाईक स्वप्नील जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, शुभम चिनके व मल्हारी सपुरे, चंद्रकांत माने यांनी केली आहे.