नशेबाजी – बरा होणारा आजार!
यंदाच्या जागतिक नशेबाजी आणि अवैध अमली पदार्थ तस्करी विरोधी दिवसाचा विषय अमली पदार्थांविषयी जनजागृती असला तरी आपण त्या बद्दल समाजात अस्सल माहिती पुरवून जास्तीत जास्त जीव वाचवले पाहिजेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने 1987 पासून 26 जुन हा दिवस जागतिक नशेबाजी आणि अवैध अमली पदार्थ तस्करी विरोधी दिवस (International Day Against Drug Abuse and illicit Trafficking) म्हणून पाळायला सुरुवात केली आज त्याला 34 वर्षे होत आहेत. तरीही या कालावधीत जगभरात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या प्रमाणात घट न होता भरच पडलेली दिसते. भारतात 50 टक्के नशेबाज हे उत्तरप्रदेश,पंजाब,हरियाणा,आंध्रप्रदेश, गुजरात या 28 पैकी फक्त 5 राज्यांमध्येच आढळून आले आहेत तर लोकसंख्येच्या घनतेनुसार पूर्वांचलतील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांमध्ये जास्त नशेबाज आढळून आले आहेत.
या नवीन शतकातील नवीन जगात व्यसनाची व्याप्ती फक्त अमली पदार्थ किंवा मद्य एव्हढ्यापुर्ती मर्यादित न राहता, वर्तणुकीविषयक व्यसनाचा देखील ह्यात समावेष होत आहे. ह्या व्यसनामध्ये जुगाराचा आणि संगणकावरील आभासी खेळांचा देखील समावेश होतो. याच मानसिक अस्थिरतेला आणि त्रासाला शांत करण्यासाठी अनेक व्यक्ती या नशिल्या पदार्थांचे सेवन करतात. या व्यसनामुळे उदासीन मनुष्य काही काळासाठी त्यातून मुक्त होतात. या साऱ्यांचे वाईट परिणाम माहीत असूनही त्या पदार्थांमुळे एक प्रकारे त्रासदायक प्रसंगांना सामोरे जायला हिम्मत मिळाली असे त्या व्यक्तीला वाटत राहते.
अनेक व्यसनाधीन व्यक्ती क्षणिक आनंदासाठी आपले शारीरिक आरोग्य धोक्यात टाकायला तयार होतात ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. अनेकवेळा व्यक्तीना भूतकाळातील काही अंधाऱ्या आठवणींमधून बाहेर पडायला आधार मिळालेला नसतो. मग व्यसन हाच त्यांना एक आधार वाटू लागतो. व्यसनाधीनतेचा हा आजार विकसित राष्ट्रांमध्ये अविकसित राष्ट्रांपेक्षा जास्त प्रमाणात आहे. हा व्यसनाचा भस्मासुर मिटवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. कोरोना काळात ‘एकी हेच बळ’ हे आपण पाहिले.
जर इतर विकारांतून बरे झालेलें नागरिक पुन्हा समाजात मिळून मिसळून जातात तसेच व्यसनाधीन व्यक्तीही बरे झाल्यावर समाजाचा अभिन्न भाग बनतील. यंदाच्या जागतिक नशेबाजी आणि अवैध अमली पदार्थ तस्करी विरोधी दिवसाचा विषय अमली पदार्थांविषयी जनजागृती असला तरी आपण त्या बद्दल समाजात अस्सल माहिती पुरवून जास्तीत जास्त जीव वाचवले पाहिजेत. (प्रज्वल पायगुडे)