पुणे मनपा समोर वाघोलीकारांचे जन आंदोलन
वाघोलीतील मुलभूत प्रश्न सोडवण्याबाबत मनपा प्रशासन उदासीन
वाघोली : पुणे महानगरपालिका वाघोलीतील पाणी, रस्ता व इतर मुलभूत प्रश्नांसाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याने टीम वाको (टीम वाघोली अगेन्स्ट करप्शन) व वाघोलीतील नागरिकांच्यावतीने महापालिकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयासमोर महापालिका व पीएमआरडीएच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येत आहे.
वाघोलीचा महापालिकेत समावेश होऊन २ वर्षाचा कालावधी झाला असतानाही पाणी, रस्ता व इतर मुलभूत सुविधांसाठी महापालिकेने ठोस कार्यवाही केली नसल्याची खंत वाघोलीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. टीम वाको व वाघोलीतील नागरिकांकडून वाघोली महापालिका कार्यालासमोर आंदोलन करूनही महापालिका ठोस उपाययोजना करीत नसल्याने मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २० जुलै रोजी नागरिकांकडून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून आंदोल सुरु असताना अद्यापही मनपा व पीएमआरडीए प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन कर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाघोली गाव महापालिकेत गेल्यामुळे मुलभूत सुविधा मिळतील असे वाटले होते परंतु वाघोलीकारांच्या पदरी निराशाच पडली.
वाघोली गावाचा समावेश होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु अद्यापही वाघोलीकर रस्ते, पाणी आदी मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मागील दोन दिवसांपासून महिला, पुरुषांसह मनपा कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
– अनिलकुमार मिश्रा (अध्यक्ष, वाको वेलफेअर असोसिएशन)











